रत्नागिरी - एकेकाळी भाजपचा अभेद्य गड समजला जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघावर गेल्या एक दशकापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र गेल्या महिनाभरात झालेली राजकीय उलथापालथ, यामुळे या मतदारसंघातील चित्र बदलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत 15 वर्षानंतर शिवसेनेत घरवापसी केली. त्यामुळे या जागेवरून सेना-भाजप युतीत कलह निर्माण झाला आहे.
भाजपने या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. तर एकीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, जन आशीर्वाद यात्रा गुहागरमध्ये आली असता भास्कर जाधवच या मतदारसंघातून लढणार असे संकेत दिले होते. त्यामुळे इथे शिवसेना-भाजपमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. जाधव यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण खरी रंगत येतील ती युतीचा उमेदवार जाहीर झाल्यावर आणि राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे ठरल्यावर. तसेच यावेळीही युतीतील भांडणात तिसऱ्याच उमेदवाराची सरशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुहागर मतदारसंघावरून शिवसेना भाजप युतीत कलह निर्माण होण्याची दाट शक्यता हेही वाचा... इतिहास 'मनसे' च्या बाजूने! शिवसेनाही कधी काळी होती अडचणीत
गुहागर मतदारसंघाचा इतिहास
1978 पासून गुहागर विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीला जनता दल आणि त्यानंतर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. भाजप म्हणजेच पर्यायाने नातू कुटुंबाचं वर्चस्व, 1980 चा अपवाद सोडल्यास 2009 पर्यंत या मतदारसंघावर राहिले आहे. 2009 मध्ये युतीतील जागा वाटपामध्ये भाजपने हा मतदारसंघ तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्यासाठी सेनेला सोडला आणि भाजपला इथं घरघर लागली. डॉ. विनय नातू यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष लढवली. रामदास कदम आणि डॉ. विनय नातू या दोघांमध्ये शिवसेना भाजपची मते विभागल्याने राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना एकप्रकारे इथे लॉटरी लागली. या निवडणुकीनंतर डॉ. विनय नातू पुन्हा भाजपमध्ये परतले. गेल्यावेळी (2014) त्यांनी भाजपकडून निवडणूकही लढवली. मात्र 2014 च्या निवडणूकीत शिवसेना - भाजप वेगवेगळे लढले होते. त्यामुळे नातू यांना पुन्हा अपयश आलं. त्यामुळे गेली 10 वर्ष भास्कर जाधव यांचेच मतदार संघात वर्चस्व आहे. सध्या भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे युतीत ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येणार यावर येथील राजकारणाची समीकरणे अवलंबून असणार आहेत.
शिवसेना - भाजपमध्ये तिढा
भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पुन्हा ते येथूनच निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. जन आशीर्वाद यात्रा गुहागरमध्ये आल्यावर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपण पुन्हा भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी आणि विजयी मिरवणूकीला येऊ असे सांगित जाधवांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही आपण गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या प्रचाराला येऊ, असे त्यावेळी जाहीर केले होते. तर दुसरीकडे भाजप मात्र या जागेसाठी आग्रही आहे. भाजपला हा मतदारसंघ सुटल्यास डॉ. विनय नातू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा रंगतदार इतिहास
कुणबी समाज महत्वाचा फँक्टर
भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यामुळे इथे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही. भास्कर जाधव यांच्याबद्दल कुणबी समाजामध्ये नाराजी आहे. ही नाराजी गुहागर नगर पंचायत निवडणूकीवेळी दिसून आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. नऊ जागा मिळालेल्या शहर विकास आघाडीचे राजेश बेंडल नगराध्यक्ष झाले. राजेश बेंडल यांचेच नाव सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी चर्चेत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आणि जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापती सहदेव बेटकर यांचेही नाव चर्चेत आहे. बेटकर यांना शिवसेनेच्या वरिष्ठांकडून यापूर्वी या मतदारसंघात तयारीला लागण्यास सांगण्यात आले होते, असे खुद्द बेटकर सांगतात. पण भास्कर जाधव यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे बेटकर यांचे नाव मागे पडले आहे. अलिकडे बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे ते राष्ट्रवादीतून लढणार का याबाबत राजकिय वर्तुळात चर्चा झडू लागल्या आहेत. गुहागर मतदारसंघात 60 टक्के पेक्षा जास्त मतदार कुणबी समाजाचे मतदार आहेत. बेटकर यांच्यामागे समाज भक्कमपणे उभा राहिल्यास या मतदारसंघात कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते.
गुहागर विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी ? निवडणूकीचे वर्ष, विजयी उमेदवार आणि पक्ष
- 1978 - डॉ. श्रीधर नातू, जनता
- 1980 - रामचंद्र बेंडल, काँग्रेस
- 1985 - डॉ. श्रीधर नातू, भाजप
- 1990 - डॉ. श्रीधर नातू, भाजप
- 1993 - डॉ. विनय नातू, भाजप (पोटनिवडणूक)
- 1995- डॉ. विनय नातू, भाजप
- 1995 - डॉ. विनय नातू, भाजप
- 1999 - डॉ. विनय नातू, भाजप
- 2004 - डॉ. विनय नातू , भाजप
- 2009 - भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस
- 2014 - भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस
हेही वाचा... 'शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा बोलबाला'