महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: तिवरे धरण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण...

तिवरे धरण दुर्घटनेतील 15 कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन तिवरेमध्येच एका माळावर कंटेनरच्या घरांमध्ये करण्यात आले आहे. काही कुटुंब सध्या या घरांमध्ये राहतात. मात्र, त्यांना इथे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी टँकरने पाणीपुरवठा व्हायचा, मात्र गेले काही दिवस पाणीपुरवठा होत नाही.

one-year-has-passed-tiwari-dam-accident-in-ratnagiri
ईटीव्ही भारत विशेष: तिवरे धरण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण...

By

Published : Jul 1, 2020, 3:39 PM IST

Updated : Jul 2, 2020, 8:04 AM IST

रत्नागिरी-जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटी दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या दुर्घटनेत अनेक संसार उध्वस्त झाले, शेती वाहून गेली, होत्याचे नव्हते झाले. तो दिवस आठवला की आजही इथल्या ग्रामस्थांच्या अंगाचा थरकाप उडतो.

तीवरे धरण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण...

2 जुलै 2019 ची अमावस्येच्या रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि धरणानजीक वसलेल्या भेंदवाडीचे होत्याचे नव्हते झाले. भेंदवाडीतील 22 घरे, जनावरांचे गोठे आणि 22 जण या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले होते. या दुर्घटनेत त्यावेळी एकूण 22 जण बेपत्ता झाले होते. 22 पैकी 21 मृतदेह सापडले. मात्र, तेव्हा दीड वर्षांची असणारी दुर्वा अद्यापही बेपत्ता आहे. दरम्यान मृतदेह सापडलेल्या 21 पैकी 19 जणांच्या वारसांना शासनाकडून धनादेश वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत केंद्र सरकारकडून दोन लाख तर राज्याने नैसर्गिक आपत्ती मदत निधीतून चार लाख 6 लाखांची मदत देण्यात आली.


दरम्यान वर्षभरानंतरही इथले अनेक प्रश्न कायम आहेत. पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही पूर्ण सुटलेला नाही. रस्ते, पूल मंजुरी कागदावरच आहेत. एसआयटी अहवाल जाहीर झालेला नाही. धरणाच्या पुर्नबांधणीचा प्रस्तावही शासनदरबारी अडकून पडलेला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतील 15 कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन तिवरेमध्येच एका माळावर कंटेनरच्या घरांमध्ये करण्यात आले आहे. काही कुटुंब सध्या या घरांमध्ये राहतात. मात्र, त्यांना इथे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी टँकरने पाणीपुरवठा व्हायचा, मात्र गेले काही दिवस पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नदी किंवा ओहळातून पाणी आणावे लागते. इथल्या घरांमध्ये राहणारे काहीजण वयोवृद्ध आहेत. त्यामुळे नदीवरही जाता येत नाही. अशी स्थिती असल्याचे ग्रामस्थ सांगतात. शेती वाहून गेल्याने उदरनिर्वाहाचे साधनही गेले. आशा परिस्थितीत करायचे काय, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. त्यामुळे कायमस्वरुपी पुनर्वसन लवकरात लवकर करावे अशी मागणी धरणफुटीग्रस्त करत आहेत.

पुनर्वसन प्रश्न
या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या एकूण 56 कुटुंबांचे पुनर्वसन कायमस्वरुपी करण्यात येणार आहे. दरम्यान कुटुंबांच्या पुनवर्सनाच्या जागेसाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अलोरे आणि नागावे येथील असलेल्या जागेसाठी प्रस्ताव गेल्यावर्षीच ऑगस्ट महिन्यात सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला महामंडळाकडून मान्यता मिळाली. त्यानंतर जमीनही महसूलकडे वर्ग झाली. सध्या इथल्या काही घरांच्या कामाची निविदाही निघाली आहे.

दरम्यान 14 कुटुंबियांना तिवरे गावामध्येच पुनवर्सन हवे आहे. त्यांच्यासाठी लागणारी जागा देण्यास एक खासगी जागामालक देण्यास तयारही झाला आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती चिपळूणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली.

विशेष चौकशी समितीचा अहवाल अद्याप जाहीर नाही...
तिवरे धरण दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष उच्चस्तरीय चौकशी पथक स्थापन करण्यात आले होते. जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे हे या पथकाचे प्रमुख होते. तर या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश होता. या विशेष चौकशी पथकाने त्याच महिन्यात घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांचे म्हणणेही ऐकून घेतले. मात्र, या पथकाच्या अहवालाचे काय झाले? तो अद्याप जाहीर का झाला नाही, असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

Last Updated : Jul 2, 2020, 8:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details