महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दापोलीत पुन्हा मृतावस्थेत सापडला डॉल्फिन, निसर्गप्रेमींना चिंता - dolphin dead ratnagiri

दापोली तालुक्यात गेल्या दोन महिन्यात डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडण्याचा हा तिसऱ्यांदा प्रकार समोर आला आहे. वारंवार डॉल्फिन मासे मृतावस्थेत सापडत असल्यामुळे निसर्गप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे.

डॉल्फिन
डॉल्फिन

By

Published : May 24, 2020, 6:45 PM IST

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील हर्णे नवानगर समुद्रकिनारी पुन्हा एक मृत डॉल्फिन मासा ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच हा डॉल्फिन किनाऱ्याला लागला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा डॉल्फिन कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे आज घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हजर राहून पंचनामा करत ताबडतोब ग्रामस्थांच्या मदतीने तिथेच पुळणीत खड्डा काढून त्याला पुरण्यात आले.

डॉल्फिनला पुरण्यात आले

दापोली तालुक्यात गेल्या दोन महिन्यात डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडण्याचा हा तिसऱ्यांदा प्रकार समोर आला आहे. वारंवार हे डॉल्फिन माशांच्या बाबतीत होत असल्यामुळे निसर्गप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे. दापोली तालुक्यातील सालदुरे, पाळंदे येथे समुद्र किनारी गेल्या काही दिवसांपूर्वी एक मृत डॉल्फिन सापडला होता. त्यानंतर ३ मे रोजी दुसरा एक मृत डॉल्फिन समुद्रातून वाहून येऊन किनार्‍यावर पडलेला आढळून आला. एकाच आठवड्यात दोन डॉल्फिन माशांचा मृत्यू ओढवल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. काही दिवसांपूर्वी गुहागर येथील समुद्र किनारीदेखील मृत डॉल्फिन सापडला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा हर्णे नवानगर येथे मृतावस्थेत डॉल्फिन सापडला. दापोली तालुक्यात या दोन महिन्यातील मृत डॉल्फिन किनाऱ्यावर सापडण्याची ही तिसरी घटना आहे. मात्र, हे डॉल्फिन नेमके कोणत्या कारणाने मृत होत आहेत, याचा ठोस शोध लावून डॉल्फिन मृत होण्याचे कारण समोर येणे आवश्यक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details