रत्नागिरी- जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण दिल्लीत झालेल्या मरकझ कार्यक्रमात गेला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवालात हा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीला जाऊन आलेल्या ५ जणांचे काल जिल्हा रुग्णालयात विलगीकरण करण्यात आले होते. यापैकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल हा निगेटिव्ह आला होता. तर, उर्वरित ४ पैकी आज एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती ही शहरातील राजीवडा या भागातील असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी होणार आहे.
यापूर्वी गुहागरमधल्या शृंगारतळी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. मात्र, उपचारानंतरच्या त्याच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे, जिल्हा कोरोना मुक्त झाला होता. मात्र, आता अजून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने शहरातील आरोग्य विभाग सतर्क झाले असून नागरिकांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे.
दरम्यान, शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर यंत्रणा अती सतर्क झाल्या आहेत. राजीवडा परिसरातील ३ किलोमीटरचा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणीही आत किंवा बाहेर जाऊ शकणार नाही. तर, राजीवाडी परिसरातील २ किलोमीटरचा परिसर हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
वाचा-आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान जाहीर करा, निलेश राणेंची मागणी