रत्नागिरी-जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच महत्वाचा सण म्हणजे शिमगोत्सव अगदी तोंडावर आला आहे. शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून नागरीक येण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नियंत्रणात ठेवण्याच्या हेतूने व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव/होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
- या आहेत सूचना
- सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारकांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर किंवा अँटीजन चाचणी करुन घ्यावी.
- सर्व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक/पदाधिकारी यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच स्थानिक ग्रामदेवतेच्या पालखीला रुपे लावणे, सजविणे, बंधनकारक राहील.
- 25 ग्रामस्थ व मानकन्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीसाठी जाईल. पालखी शक्यतो वाहनातून नेल्यास योग्य राहील. वाहनातून नेणे शक्य नसल्यास अशा वेळी पालखी धारकांनी स्वत: वाहून नेण्यास परवानगी राहील. कोणत्याही परिस्थितीत 50 लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत याची दक्षता मंदिर विश्वस्त, व्यवस्थापक, ग्रामस्थ, मानकरी, नागरी व ग्रामकृती दल यांनी घ्यावी. यासाठी पालखी दर्शनाच्या वेळा निर्धारीत करुन देण्यात याव्यात.
- होळी व पालखीची पूजा, नवस, पेढे, हार, नारळ इत्यादी स्वरुपात स्विकारू नयेत. तसेच प्रसाद वाटपही करु नये.
- सहाणेवर पालखी व होळीचे दर्शनासाठी प्रत्येक वाडीतील, भागातील लोकांना स्वतंत्र दिवस नेमून द्यावा किंवा सदर कालावधीत 3/3 तास नेमून देणे. जेणेकरुन एकाच वेळी गर्दी होणार नाही. तथापि, अशावेळी उपस्थितांनी योग्य ते सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील. उपस्थित सर्वांनी मास्क परीधान करणे बंधनकारक राहील. तसेच याचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. उपस्थित सर्वांचे थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक राहील. उपस्थित सर्वांनी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक सुविधांचे व मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हँडल आदींचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. श्वसनासंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिंकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरुमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच वापरलेला टिश्यू पेपरची योग्य त्या पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परिसरात थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. तसेच याचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल.
- पालखी घरोघरी नेवू नये.
- पालखी गर्दीमध्ये नेता येणार नाही.
- होळी हा पारंपारिक सण आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोट्या होळ्या आणून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार होम करावे.
- गावात खेळे, नमन इत्यादी लोककलेचे कार्यक्रम करु नयेत.
- प्रथेपुरते खेळ्यांचे कार्यक्रम 25 ते 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करावे.
- धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळण्याचे टाळावे.
- छोट्या-छोट्या ओळखीच्या समुहामध्ये शक्यतो रंग खेळावेत. मोठ्या व अनोळखी समुहामध्ये रंग खेळू नयेत.
- मुंबईतील ग्रामस्थांना शक्यतो गावी न येण्याचे आवाहन करावे. तसेच होळीच्या कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबूक व वेबसाईट इत्यादी माध्यमांव्दारे उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन गावी न येणाऱ्या चाकरमानी यांना कार्यक्रम पाहणे शक्य होईल.
- मुंबई, पुणे किंवा अन्य भागातून प्रतिबंधित क्षेत्रामधून रत्नागिरी जिल्ह्यात होळीच्या सणासाठी येणाऱ्या नागरीकांकडे 72 तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक आहे.
- प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना ऑक्सीमीटर व धर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक राहील. त्यासाठी नागरी व ग्रामकृती दलांनी शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर उभारावेत. या स्क्रिनिंग सेंटरबाबत फ्लेक्सव्दारे जनजागृती करावी.
- स्क्रिनिंग सेंटरवर नागरीकांमध्ये सर्दी, खोकल्या सारखी लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठवावे. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला व इतर कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या कोणत्याही व्यक्तीस शिमगोत्सवात सामील होता येणार नाही, याची दक्षता नागरी व ग्रामकृती दलांनी घ्यावी.
- ग्रामकृती दल व नागरी कृती दल यांनी 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- तसेच याव्यतिरिक्त प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.