रत्नागिरी- यांत्रिकीकरण झाले आणि घाणे काळाच्या ओघात मागे पडले, मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील सांडेलागवण गावातील रहाटे कुटुंबीयांनी अद्यापही हा घाणा जपला आहे. शिवाय यातून तेलही काढले जाते. घाण्याच्या या तेलाला मागणीही चांगली आहे.
यांत्रिकीकरणाच्या काळातही रहाटे कुटुंबीयांनी जपलाय घाणा घाणे काळाच्या ओघात मागे पडलेयांंत्रिकीकरणाच्या जमान्यात सध्या पारंपरिक गोष्टी मागे पडत आहेत. त्याला घाणा किंवा कोलूदेखील अपवाद नाही. सध्या केवळ घाण्याचा बैल ऐवढ्यापुरता हा शब्द प्रयोग मर्यादित आहे. कधी काळी गावागावांमध्ये दिसणारे तेलाचे घाणे आता गायबच झाले आहेत. साधारण, 40 ते 50 वर्षापूर्वी अनेक गावांमध्ये असे घाणे दिसून येत असत. पण, यांत्रिकीकरण झाले आणि हे घाणे काळाच्या ओघात मागे पडले, गायब झाले. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील सांडेलागवण या गावात रहाटे दाम्पत्याने हा घाणा अद्यापही जपला आहे. शिवाय, यातून तेलही काढले जाते. ज्या वस्तूंपासून तेल निघते अशा सर्व वस्तूंमधून उदा. तीळ, शेंगदाणे, खोबरे, राईचं तेल या घाण्यामधून काढले जाते.
रहाटे कुटुंबीय आजही चालवतात घाणाआमच्या आजोबांपासून हा बैलाचा घाणा आहे. माझे वडीलही हा घाणा चालवतात. या घाण्याची 2 वर्षांनी डागडुजी करावी लागते, कारण लाकूड असल्याने ते कुजण्याचा धोका असतो. तीळ, खोबरे, सोयाबीन, भूईमूग यापासून हे तेल काढले जाते. या तेलाला पुणे, सासवड, सातारा, कराड, कोल्हापूर आदी ठिकाणांहून मागणी आहे. अनेकजण लहान मुलांसाठी घाण्यावरून तेल काढून नेतात, तसेच बोटींसाठी लागणारे कडू तेलही आम्ही या घाण्यातून काढतो' अशी माहिती भगवान रहाटे यांनी दिली आहे.
घाण्याला कोलू देखील म्हणतातया घाण्याला कोलूदेखील म्हणतात. हा घाणा ओढण्याचे काम बैल करतात. त्यामुळे किती श्रमाचे हे काम आहे, याचा अंदाजच बांधलेला बरा. आपल्या स्वातंत्र संग्रामात इंग्रजांकडून हाच घाणा किंवा कोलू ओढण्याची शिक्षा अनेकांना दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातील शिक्षेत याचा देखील समावेश होता. घाण्याचे तेल हे तसं शुद्ध तेल, अगदी अस्सल ऑर्गेनिक! एक बैल साधारण अडीच ते तीन तास एक घाणा ओढतो. त्यापासून केवळ 2 ते 3 लिटर तेल मिळतं. यावेळी आपण कोणती वस्तू तेलासाठी वापरतो यावर वेळेच आणि त्यातून मिळणाऱ्या तेलाचे गणित अवलंबून असते. अगदी 400 रूपये लिटर ते 1200 रूपये लिटरपर्यंत हे तेल विकले जाते.
घाणा फिरवताना बैलाची विशेष काळजीहा घाणा फिरवताना बैलाची विशेष काळजी घेतली जाते. सतत गोल-गोल फिरून त्याला चक्कर येऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यावर पट्टी किंवा ते बंद केले जातात. ही कामे कष्टाची आहेत.
तेलाला चांगली मागणीयांंत्रिकीकरणाच्या जमान्यात रिफाईंड ऑईल हाच पर्याय असला, तरी घाण्यापासून काढण्यात येणाऱ्या या तेलाला चांगली मागणी देखील आहे. हे तेल आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचे ग्राहक राजेश शेट्ये यांनी सांगितले. तसेच या तेलाचा प्रसार व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
घाण्याचे तेल फायदेशीर कायंत्रावर काढलेल्या तेलात काहीवेळा बोगस कंपन्या खोटी लेबल लावून भेसळयुक्त तेलाची विक्री करतात. भेसळयुक्त तेलाचा थेट हृदयावर परिणाम होतो. यावर उपाय म्हणून अनेकदा फिल्टर करून शुध्द केलेल्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातूनही दिला जातो. मात्र, नामवंत कंपन्यांची फिल्टर तेल विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्या पलिकडे असते. अशावेळी लाकडी घाण्यावर स्वतः तेल काढणे अथवा आपल्याकडील तीळ अथवा तत्सम धान्य देवून तेल काढून घेणे यावर कोकणवासीयांचा अधिक भर होता. एकेकाळी सर्रास सर्वत्र याच पध्दतीचा वापर केला जाई. मात्र, काळाच्या ओघात लाकडी घाण्यावर तेल काढणारी मंडळी कमी झाली आणि सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होऊ लागली.
काळाच्या ओघातही घाणे टिकले पाहिजेतलाकडी घाण्यावर तेल काढण्याचा व्यवसाय आजही काही ठिकाणी सुरू असला तरी हा प्रकार आता फार दुर्मिळ झाला आहे. काळाच्या ओघात हा घाणा दुर्मिळ होत असला, तरी याच काळात त्याचे महत्व पुन्हा वाढत आहे. बाळाच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी घाण्यापासून काढलेले ते हे उपयुक्त. शिवाय, भाजल्यानंतर देखील त्याच्या खुणा राहू नयेत यासाठी देखील घाण्याचे तेल वापरले जाते. शिवाय, आयुर्वेदासह अनेक कारणांसाठी हे तेल उपयुक्त आहे. सध्याच्या जमान्यासोबत चालायचे म्हटले तरी या साऱ्या गोष्टी पाहता अनेकांची पावले, नजरा या घाण्याच्या शोधात परत माघारी फिरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे हे घाणे काळाच्या ओघातही टिकले पाहिजेत. त्यासाठी शासन दरबारीही घाण्याची उपेक्षा होता कामा नये.