जातनिहाय जणगणनेच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने ओबीसींचा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा - ओबीसींची जणगणना
केंद्र सरकारने सन 2021-22 ची सार्वत्रिक जनगणना जातनिहाय करावी, या आग्रही मागणीसाठी ओबीसी बांधव आज हजारोंच्या संख्येने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. 'ओबीसी जनमोर्चा' व ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या या धडक मोर्चात जिल्हाभरातील जवळपास 10 हजारहून अधिक ओबीसी बांधव सहभागी झाले होते.
रत्नागिरी - केंद्र सरकारने सन 2021-22 ची सार्वत्रिक जनगणना जातनिहाय करावी, या आग्रही मागणीसाठी ओबीसी बांधव आज हजारोंच्या संख्येने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. 'ओबीसी जनमोर्चा' व ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या या धडक मोर्चात जिल्हाभरातील जवळपास 10 हजारहून अधिक ओबीसी बांधव सहभागी झाले होते. राज्यातील ओबीसी बांधवांचा जिल्ह्यातील हा पहिला मोर्चा धडक मोर्चा होता. रत्नागिरीतल्या मारुती मंदिर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा 3 किमीपर्यंत घोषणा देत शहरातून काढण्यात आला.
सरकार ओबीसी बांधवांच्या पाठीशी - मंत्री उदय सामंत
यावेळी स्थानिक आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी या मोर्चाच्या ठिकाणी भेट देत OBCच्या मोर्चाला महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ओबीसी बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.