रत्नागिरी - नाणार प्रकल्पाला एकदा घालवल्यानंतर शिवसेना पुन्हा हा प्रकल्प आणायला कबूली देणार नाही. नाणारबाबत बोलणाऱ्यांनी फक्त तोंडाची वाफ घालवत आहेत, त्यांनी नको त्या विषयात नाक खूपसू नये, अशा शब्दात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारले आहे. तसेच आम्ही यासाठी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. या राजपत्राला काही किंमत आहे की नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नाणारच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजप आमने- सामने आले आहेत. भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत गुरुवारी पत्रकार परिषदेत नाणार सर्वांच्या सहमतीने आणण्याचं वक्तव्य केले होते. यावरून आज (शुक्रवारी) लांजा येथे प्रचारासाठी आलेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारले आहे.
हेही वाचा -अखेर मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरला राणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये होणार विलिन
नाणार प्रकल्प रद्द झालेला आहे. कोकणच्या पर्यावरणाचा घात करणार नाहीत तर रोजगार मिळवून देणारे उद्योग आम्ही आणणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. इतिहास जर बघितला तर शिवसेना आपला शब्द खरा करते. नाणार घालवणार असे आम्ही सांगितले होते. काही जण शंका घेत होते. मात्र, नाणार आम्ही घालवला. नुसता घालवला नाही तर राजपत्रही प्रसिद्ध केले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नाणार आम्ही देणार नसल्याचे प्रत्युत्तर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला दिले आहे.
हेही वाचा -.... आता पोत्यात पैसे नेले तर खिशात सामान येते - छगन भुजबळ