रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या डेल्टाचा एकही सक्रिय रुग्ण नाही. मात्र आतापर्यंत डेल्टाच्या 16 रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली असून त्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेतून दिली. उर्वरित 13 रुग्ण पूर्ण बरे असून जेव्हा ते पॉझिटिव्ह होते तेव्हा त्यांना गंभीर लक्षणे नव्हती असेही पाटील यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणार्यांची तपासणी सुरुच राहणार असून लसीकरणावर अधिक भर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
डेल्टाचे सर्व रुग्ण बरे
रत्नागिरी जिल्ह्यातून आतापर्यंत 164 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डेल्टाच्या 15 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एक रुग्ण हा मुंबईतील असून त्याचा मुंबईत मृत्यू झालेला आहे. आधार कार्डवर जिल्ह्याचा पत्ता असल्याने रत्नागिरीमध्ये याची नोंद झाल्याने रुग्णांची एकूण संख्या 16 झाली आहे. उर्वरीत पंधरा रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तेरा जण पूर्ण बरे झाले आहेत. संगमेश्वरमधील आंगवली व धामणी या गावात तीन रुग्ण असून त्यातील दोघे पती-पत्नी आहेत. हे तीनही रुग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर या ठिकाणी एकही नवा कोरोना रुग्ण सापडलेला नाही. तसेच जिल्ह्यात एकही डेल्टा प्लस अॅक्टिव्ह रुग्ण नसल्याचे त्यांनी सांगितले. या दोनही गावांमध्ये टेस्टींग करण्यात येत आहेत असे पाटील यांनी सांगितले.