रत्नागिरी- परतीच्या पावसाने जिल्ह्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी आजनुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तसेच, निवळी, चांदेराई आणि सोमेश्वर येथील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देखील केले.
निलेश राणे यांनी रत्नागिरी तालुक्यातील निवळी, हरचिरी, चांदेराई, चाळके वाडी, सोमेश्वर, चिंचखरी आदी भागांचा दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा उपाध्यक्ष राजेश सावंत, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, राजू भाटलेकर, महिला जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, उमेश कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः वाहून गेले आहे. त्यामुळे, कोकणातील शेतकरी हतबल झाला आहे. भात पीक म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांची वर्षाची बेगमी असते. परंतु, परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करणे आवश्यक असतानाही राज्य शासनाचे डोळे केंद्राकडे लागून राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे सरसावले असून त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून हेक्टरी दीड लाखाची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.