रत्नागिरी : 'ज्या अँटिजेन टेस्टमधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे, त्या टेस्ट सरसकट जिल्ह्यात करण्यापेक्षा खात्रीशीर असलेल्या 'आरटी-पीसीआर' टेस्टच केल्या जाव्यात. सरस्कट सर्वांच्याच अँटिजेन टेस्ट केल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. शिवाय यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शांत डोक्याने विचार करून आरटी-पीसीआर टेस्टवर भर द्यावा. जेणेकरून आरोग्य यंत्रणेवरील ताण आणि जनतेतील भीती कमी होईल', अशा सूचना भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
जिल्ह्यातील आरटी-पीसीआरसाठीची यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरावी -
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली असून सर्वाधिक रुग्णसंख्या अँटिजेन टेस्ट मधील असल्याचे दिसून आले आहे. मुळात कोरोनासाठी तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. एक आरटी-पीसीआर, दुसरी अँटिजेन आणि तिसरी अँटिबॉडी टेस्ट. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेही (ICMR) सुरुवातीपासून कोरोनाच्या चाचण्यांसंबंधी नियम बनवून दिले आहेत. आरटी-पीसीआर टेस्ट म्हणजे Real Time Reverse Transcription Polymerase Chain Reaction. यालाच स्वॉब टेस्ट असंही म्हटलं जातंय. आरटी-पीसीआर टेस्ट ही कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते. ICMRने या चाचणीला टेस्टिंगचा गोल्ड स्टँडर्ड असं म्हटलंय. शरीरात कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असला तरी तो या टेस्टमार्फत कळू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात आरटी-पीसीआरसाठीची करोडो रुपये खर्चून यंत्रणा उभारली आहे. ती यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरावी, असं त्यांनी सांगितले.