महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक : रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये रंगणार शिवसेना विरुद्ध नारायण राणे सामना - election

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील ३-३ विधानसभा मतदारसंघ येतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास दीड लाख मताधिक्यांनी निवडून आलेले शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

नीलेश राणे

By

Published : Mar 13, 2019, 11:18 AM IST

रत्नागिरी - सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ सर्वात लक्षवेधी असणार आहे. कारण या मतदारसंघात शिवसेनेचे विनायक राऊत आणि नारायण राणे असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्यात युती झाली असली तरी भाजपमधील खदखद नेमकी कोणाच्या पारड्यात पडते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

नीलेश राणे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील ३-३ विधानसभा मतदारसंघ येतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास दीड लाख मताधिक्यांनी निवडून आलेले शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यावेळी काँग्रेसकडून उभ्या असलेल्या निलेश राणे यांचा त्यांनी पराभव केला होता. पुन्हा एकदा निलेश राणे तिसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहेत. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून ते निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर रिंगणात उतरणार आहेत.

दरम्यान युती झाल्यामुळे सेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या स्थानिक भाजपमध्ये खदखद वाढली आहे. कारण गेल्या ५ वर्षांतील शिवसेना-भाजपमधील असलेले राजकारण. विद्यमान खासदारांनी भाजपला कधीही चांगली वागणूक दिली नाही, उलट भाजपच्याच केंद्रीय नेतृत्वावर नेहमी टीका केली असल्याचे स्थानिक भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. त्यातच नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यामुळे सिंधुदुर्ग-रत्नागिरीतल्या भाजपमध्ये खदखद आहे. त्यामुळे युती झाली असली तरी सेनेच्या उमेदवाराला भाजपची शंभर टक्के साथ मिळेल का? याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे युती होण्याआगोरदच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील, अशी घोषणा केली होती. त्यामळे शिवसेनेला टक्कर देण्यासाठी राणेंची फौज पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. निलेश राणे यांना एकदा विजय तर एक वेळा पराभव स्विकारावा लागला होता. सुरेश प्रभूंच्या विरोधातली निवडणूक निलेश राणे जिंकले होते. तर गेल्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी निलेश राणेंनी सुद्धा कंबर कसली आहे.
विकास हा मुद्दा या मतदारसंघात कळीचा ठरणार आहे. राणे सेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे आणि नारायण राणेंचे हाडवैर आजही कायम आहे. त्यामळे ही लढत शिवसेना विरुद्ध राणे अशीच असणार आहेत. त्यामुळे शिवसेना आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार कि राणे त्याला सुरुंग लावणार हे आगामी काळच ठरवेल.

ABOUT THE AUTHOR

...view details