रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलीस करत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी लाईफटाईम हॉस्पिटलचे संचालक, भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी निर्जंतुकीकरण कक्ष उपलब्ध करून दिला आहे.
निलेश राणे यांनी पोलिसांकरता दिला निर्जंतुकीकरण कक्ष पोलीस हा राज्य सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत. पोलिसांमुळे आपण सुरक्षित असलो तरी त्यांचे जीवन मात्र खूपच असुरक्षित आहे, असे असताना रत्नागिरीचे पोलीस कर्मचारी, आज जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून लाईफटाईम हॉस्पिटलचे संचालक, माजी खासदार निलेश राणे यांनी निर्जंतुकीकरण कक्ष उपलब्ध करून दिला.
या कक्षात कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता सोप लिक्वीड वापरले जाणार आहे. तसेच हा निर्जंतुकीकरण कक्ष पूर्णपणे स्वयंचलित असून तो सोलर सिस्टीम वर चालतो. त्यात सेन्सर बसविण्यात आले असून, ज्यावेळी या कक्षात व्यक्ती येईल त्याचवेळी तो कार्यान्वित होतो. हा अद्ययावत निर्जंतुकीकरण कक्ष शहर पोलीस स्थानक आणि उपविभागीय पोलीस कार्यालय येथे बसविण्यात आला असून, शहर पोलीस स्थानकात होणाऱ्या दैनंदिन व्यवस्थेत तो अत्यंत प्रभावी काम करणार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या उपस्थितीत हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला. यावेळी रत्नागिरी आर्मीचे महेश गर्दे, स्पिरिच्युअल सिक्रेट कंपनीचे अमित वराडकर यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेऊन पोलिसांकरिता निर्जंतुकीकरण कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलिसांनी माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.