रत्नागिरी : पैसे आणि सोन्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार ( MP of Ratnagiri Sindhudurg ) असलेले विनायक राऊत ( MP Vinayak Raut ) यांचे लोकांच्या खिशात हात जातात, असे त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी आता बोलत आहेत. हे ऐकून फार आश्चर्य वाटले नसले तरीही खासदारकीची वैभवशाली परंपरा असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणात पेटी वाजवून सभ्यपणाचा आव आणणाऱ्या या माणसामुळे आमचा कोकण बदनाम होत आहे, अशी टीका भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी खासदार ( BJP state secretary and former MP ) नीलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर केली आहे.
नीलेश राणेंनी केली खरमरीत टीका : शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्यावर सध्या शिवसेनेतूनच आरोप होत असलेले पाहायला मिळत आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी विनायक राऊतांनी बांगर यांच्याकडून चेन घेतल्याचा गौप्यस्फोट केला. त्याआधीच आमदार राजेश क्षीरसागर यांनीही राऊतांवर आरोप केले होते. या सगळ्या घडामोडीनंतर नीलेश राणे यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नीलेश राणे यांनी म्हटले आहे की, खासदार विनायकरावांबद्दल जे काय मागच्या पंधरा दिवसांपासून त्यांच्याच पक्षातले सहकारी आमदार खासदार जे काय बोलतात ते ऐकून माझ्यासारख्या माणसाला आश्चर्य वाटले नाही. कारण मला माहिती होते की, हा माणूस तसाच आहे. पण, वाईट या गोष्टीचा वाटते याच्यामुळे कोकणाचे नाव खराब झाले. हा माणूस कोकणातून निवडून जातो, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा खासदार आहे. असा माणूस महाराष्ट्रात बदनाम होणे हे आमच्या मातीसाठी, आमच्या कोकणासाठी ऐकायला बरे वाटत नाही.
शिवसेना खासदारांच्या आरोपाचा धागा पकडून टीका : ते पुढे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीसाठी हा माणूस पैसे खातो. प्रवासासाठी पैसे, हॉटेलसाठी पैसे, तिकीट द्यायला पैसे, स्वतःच्या निवडणुकीसाठी पैसे हा माणूस घेतो. आणि जर पैसे मिळाले नाही तर, अंगावर चेन किंवा जे काही सोनं असतं, ते पण लुटतो. असा आमच्या कोकणातून कधीच कोणी माणूस निवडून गेला नव्हता. पहिल्यांदा कोकणाला बदनाम करणारा माणूस आज खासदार म्हणून तिकडे निवडून गेलाय या गोष्टीचा दुःख वाटते. एवढी वर्ष लोटूनसुद्धा कधी त्या माणसाने कोकणामध्ये कुठली संस्था उभी केली नाही. ना कधी कुठली फॅक्टरी उभी केली. पाच जणांना नोकऱ्या दिल्या नाहीत, पाच आरोग्यविषयी, कॅन्सर पेशंटना, डायलिसिससाठी कधी मदत केली नाही. खेळाडूंना मदत केली नाही. तुम्हाला एकही असे उदाहरण भेटणार नाही, कुठल्याही गावात भेटणार नाही किंवा शहरात भेटणार नाही की या माणसाने मला मदत केली असेल.
पंतप्रधान मोदी यांच्या लाटेत आले निवडून : दोन वेळा पंतप्रधान मोदी साहेबांच्या लाटेत हा माणूस निवडून गेला. पण एवढा ताठ मानेने असे दाखवतो की, त्याच्यासारखा पेटी वाजवणार कोणच नाही. पण खरे धंदे हे इथून तिथून लोकांच्या खिशात हात घालून पैसे काढणे, लुटणं, सोनं लुटणं. असा कधी खासदार करतो, अस मी ऐकले नाही. जगाच्या नकाशामध्ये असा कुठला खासदार लोकांच्या अंगावर सोनं काढून घर चालवतो, असे मी कधी बघितले नाही. त्यामुळे जेव्हा संधी येईल, तेव्हा योग्य न्याय आपण अशा माणसाला द्याल आणि योग्य ती जागा या माणसाला दाखवा, असे आवाहन नीलेश राणे यांनी जनतेला केले आहे.
हेही वाचा :Nilesh Rane Criticized Vinayak Raut : खासदार विनायक राऊत यांनी कोकणचे नाव खराब केले - निलेश राणे