रत्नागिरी -राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला राज्यात तपास करता येणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले असून माजी खासदार नीलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जाेरदार टीका केली आहे. हा तर महाराष्ट्राचा बंगाल करायचा निर्णय असल्याचे माजी खासदार नीलेश राणेंनी म्हटले आहे. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काही गोष्टी लपवण्यासाठी सरकार हा प्रयत्न करत आहे. सीबीआयला सुप्रिम कोर्टाच्या मान्यतेने तपासाची परवानगी मिळते, राज्य सरकारच्या परवागीची आवश्यकता लागत नाही. आपले काळे धंदे लवपावयचे असल्याने, वर्गणी चोरांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे सरकार बिनडोक असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी लक्ष्य केले. सोलापूर जिल्ह्याचा मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसांचा दौरा केला; मात्र पहिल्या दिवशी दौरा आटपून दुसऱ्या दिवशी त्यांना केवळ ३३ किलोमीटर अंतर पाहणीसाठी जायचे होते. पण त्यासाठी मुख्यमंत्री सोलापूरला न थांबवा हेलिकॉप्टरमधून मुंबईला गेले आणि दुसऱ्या दिवशी परत येवून ३३ किलोमीटरवरचा पाहणी दौरा केला. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारवर ४० लाखांचा बोजा टाकल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना मुंबईच्या बाहेर राहाता येत नाही, मुख्यमंत्र्यांना घर सोडता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने या आगोदर पाहिला नसल्याची उपहासात्मक टीकाही निलेश राणे यांनी यावेळी केली.
यावेळी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कर्ज काढण्याच्या विषयावरूनही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र सोडले. कर्ज काढणार असे विजय वड्डेट्टीवार म्हणाले, पण हे कर्ज कधी काढणार, मदतीसाठी दरवेळी केंद्राने मदत करायची का, केंद्र मदत करेल, पण कर्ज काढण्याचा फक्त देखावा राज्य सरकार करत असल्याची टीका राणे यांनी केली आहे.