रत्नागिरी -कोरोनावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकार टीका केली आहे. स्वतःकडे उपाययोजना नसल्याने राज्य सरकार केंद्राकडे भिक मागत आहे. राज्य सरकारला रतन टाटांनी दिलेले पंधराशेकोटी रुपये कुठं आहेत, मुकेश अंबानींचे पाचशे कोटी रुपये कुठे आहेत, ते पैसे कुठे वापरले गेले ते सांगा. असा घणाघात महाविकास आघाडीवर निलेश राणेंनी रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेत केला.
रत्नागिरी जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही, अडीच दिवसांसाठी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आले आणि निघून गेले. पालकमंत्र्यांनी जिल्हा वाऱ्यावर टाकलाय असे सांगत माजी खासदार निलेश राणेंनी पालकमंत्री अनिल परब यांच्यावरही प्रहार केला. यावेळी निलेश राणे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर देखील जोरदार टीका केली. तर सामनाच्या अग्रलेखावरसुद्धा माजी खासदार निलेश राणेंनी खोचक प्रतिक्रिया दिली. मी सामना वाचत नाही असं सांगत त्यांनी सामना पेपरची खिल्ली उडवली.