रत्नागिरी - आमच्या कार्यकर्त्यांवर किंवा आमदारावर कुणी हात टाकला तर जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. ते आज (गुरुवार) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीतून या वक्तव्याविरोधात तिखट प्रतिक्रिया येत असून, या वक्तव्याचा राज्यभर निषेधही करण्यात आला. दरम्यान, पडळकर यांच्या विधानाबाबत माजी खासदार निलेश राणे यांना विचारलं असता, राणे म्हणाले की, 'पडळकर यांनी काय विधान केलं त्याच्या मी फार खोलात जाणार नाही, आमच्या मोदी साहेबांवरसुद्धा अतिशय खालच्या दर्जाची टीका राष्ट्रवादी आणि शिवसेनेवाल्यांनी केली आहे. आता पडळकरांच्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या धमक्या सुरू झाल्याचे राणे म्हणाले.
राष्ट्रवादीची काही लोकं आम्ही याला काळं फासू, अंगावर जाऊ, धडा शिकवू अशा धमक्या द्यायला लागले आहेत. पडळकर हे भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या अंगावर जायच्या वार्ता आमच्याबरोबर करू नका, कारण आम्ही काही गप्प बसणार नाही. आम्हीही जशास तसं उत्तर देऊ. फक्त गृहखातं तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्ही वाट्टेल ते कराल हा तुमचा गैरसमज ठरेल. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, आमदाराला काही जरी झालं, तरी आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.