रत्नागिरी :काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि उद्योजक प्रशांत यादव व चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव या दाम्पत्याने कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज व्हीसी द्वारे पार पडलं. त्यानंतर प्रत्यक्ष उदघाटन सोहळा उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजप नेते, आमदार प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
रात्री जेवायला एकत्र :यावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मंत्री उदय सामंत आणि मी आम्ही एकमेकांच्या विरोधात जरी बोललो, तरी रात्री जेवायला एकत्र असतो, एवढी आमची मैत्री आहे. आता तर प्रॉब्लेमच नाही आम्ही दोघंही एकदम घट्ट झालोय, गुवाहाटीपासून मुंबईपर्यंत असं लाड यांनी सांगताच एकच हशा पिकला.
उदय सामंत यांचं कौतुक :राष्ट्रवादी आमदार शेखर निकम म्हणाले की, मंत्री उदय सामंत सगळ्यांना विश्वासात घेऊन चांगलं काम करत आहेत. कोकणाचा प्रश्न असेल तर त्यावेळी कुठचंही राजकारण न करता ते काम करतात असं कौतुक राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी मंत्री उदय सामंत यांचं केलं.