रत्नागिरी - राजापूर विधानसभा मतदारसंघात नेमका काय विकास झाला आहे, तो विकास आम्ही शोधत असल्याचा टोला लगावत राजापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे उमेदवार अविनाश लाड यांनी विद्यमान आमदार आणि शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लांजा शहरामध्ये आज काँग्रेसकडून प्रचारफेरी काढण्यात आली.
यावेळी बोलताना अविनाश लाड म्हणाले की, राजापूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजलेले आहेत. पाण्याची बोंबाबोंब आहे. मात्र, आमदार राजन साळवी लोकांना फसवण्याचे, थापा मारण्याचे आणि खोटे बोलायचे एवढेच काम करत असल्याची टीका अविनाश लाड यांनी केली आहे. 400 कोटींची कामे केली म्हणतात ती आहेत कुठे? असा सवाल अविनाश लाड उपस्थित केला आहे. यांनी फक्त ठेकेदारांसाठी कामे केली, जनतेसाठी काहीही केले नाही, नुसती दिशाभूल केली. त्यामुळे जनतेचा उद्रेक आता झालेला असून या निष्क्रिय माणसाला घालवण्याची आता लोकांनीच तयारी केलेली आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे लाड यावेळी म्हणाले.