महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाणार रिफायनरीवरून पुन्हा वातावरण तापलं; समर्थक आशावादी, तर विरोधक आक्रमक

प्रकल्प नाणार परिसरात रहावा यासाठी १४ गावातील जमीन मालकांनी प्रकल्पासाठी संमती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र देण्यात आले आहेत. ८ हजार एकरवरील जमीन मालकांनी संमतीपत्रे देत जिल्हाधिकाऱ्यांसमोर नोटरी करण्यात आली आहे.

By

Published : Jun 27, 2019, 10:16 PM IST

नाणार प्रकल्प

रत्नागिरी- गेली दोन वर्षे कोकणात विरोधामुळे चर्चेत आलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाली असली तरी समर्थक मात्र, हा प्रकल्प याच परिसरात होईल, याबाबत आशावादी आहेत. या प्रकल्पासाठी १४ गावातील ८ हजार एकरावरील जमीन मालकांनी थेट या प्रकल्पासाठी संमतीपत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. तर विरोधकही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा कोकणात वातावरण तापले आहे.

नाणार रिफायनरीवरून पुन्हा वातावरण तापलं

सौदी अरेबियाची अराम्को, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम अशा कंपन्या एकत्र येत सुमारे ३ लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु, शिवसेनेने नाणारला विरोध केला. तसेच भाजपबरोबर युती करताना हा प्रकल्प रद्द करण्याची अट घातली. नाणारमधून हा प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना काढली गेली. त्यानंतर हा प्रकल्प जाणार कुठे? असा प्रश्न निर्माण झाला.

हा प्रकल्प रायगडमध्ये जाणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. तिथे या प्रकल्पासाठी विरोध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनीही सष्ट केले. मात्र, हा प्रकल्प नाणार परिसरात रहावा यासाठी १४ गावातील जमीन मालकांनी प्रकल्पासाठी संमती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र देण्यात आले आहेत. ८ हजार एकरावरील जमीन मालकांनी संमतीपत्रे देत जिल्हाधिकाऱ्यांसमोर नोटरी करण्यात आली आहे, असे भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले. तर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनीही याला दुजोरा दिला आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. शिवसेनेनेदेखील कोकणातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला होता. पण, आता १४ गावातील ८ हजार शेतकऱ्यांनी हा प्रकल्प नाणारमध्येच रहाण्यासाठी संमतीपत्रे दिल्याने भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाणारचा विरोध उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंनी मागे घ्यावा, असे सांगत जठारांनी प्रकल्पाचे समर्थन केले आहे.

नाणार प्रकल्पाच्या विरोधामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण गेली दोन वर्षे तापले होते. पण, अखेर लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेना युती झाली आणि हा प्रकल्प नाणार परिसरात होणार नसल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. पण, समर्थक मात्र अजूनही आशावादी असून प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा टिकवण्यासाठी पुन्हा डावपेच सुरु झाले आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्पावरून पुन्हा घमासान पहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details