रत्नागिरी - जिल्हा पोलीस कल्याण निधीच्या मदतीकरता "रत्नागिरी जिल्हा पोलीस दल" यांच्यामार्फत बहारदार "संगीत रजनी"चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथील पवन तलाव येथे ६.३० वाजता, तर रत्नागिरी पोलीस ग्राऊंड येथे रविवारी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता "संगीत रजनी" सादर होणार आहे.
महाराष्ट्रातील २ दिग्गज गायक कलाकार अवधूत गुप्ते व स्वप्नील बांदोडकर यांच्या धमाकेदार सादरीकरणाने ही संगीत रजनी रंगणार आहे. याचबरोबर "सुर नवा ध्यास नवा" फेम सध्याची लोकप्रिय गायिका जुईली जोगळेकर हिच्या सुरांबरोबर, आघाडीची नृत्यांगना सुवर्णा काळे हिचा अप्रतिम नृत्याविष्कारही रसिकांना "संगीत रजनी"मध्ये पहायला मिळणार असल्याची माहिती रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे. "मँगो इव्हेंटस"तर्फे या "संगीत रजनी" सूत्रबद्ध नियोजन करण्यात येत आहे.
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी आपले कर्तव्य अहोरात्र पार पडत असतो. राज्याच्या कायद्याची अंमलबजावणी करणारा एक महत्वपूर्ण घटक म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. नियम कायदे यांचे पालन करून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबियांनाही अनेक समस्या भेडसावत असतात. हे जाणून व त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी, तसेच पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने १९८० साली "महाराष्ट्र पोलीस कल्याण निधी"ची स्थापना करण्यात आली. या पोलीस कल्याण निधीमधून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा पुरविणे, आर्थिक मदतीबरोबरच आवश्यक साधन-सुविधा पुरविणे, विविध कल्याणकारी योजना राबविणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात.