रत्नागिरी - क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथे ही घटना घडली. कमलाकर शंकर पारदळे, वय 45 राहणार तवसाळ तांबळवाडी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तवसाळ तांबडवाडी मधील मयत कमलाकर पारदळे व मारहाण करणारा संशयित आरोपी वसंत कृष्णा पारदळे या दोघांची घरे शेजारी आहेत. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे दोघे मित्र होते. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही. यामुळे खाडीतील मासे पकडून त्यावर रोजच्या जेवणाची व्यवस्था हे दोघे आपल्या कुटुंबासाठी करत होते. या दोघांनी मिळून मासेमारी करता पाग घेतला होता. बुधवारी दुपारी वसंत कृष्णा पारदळे यांनी कमलाकर पारदळे यास पाग आहे कोठे, अशी विचारणा केली या झालेल्या बाचाबाचीमध्ये मारहाणीत रूपांतर झाले. वसंत पारदळे याने काठीने केलेल्या मारहाणीत डोक्याला जबर मार लागल्याने, त्यातच कमलाकर पारदळे खाली कोसळताना दगडावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.