रत्नागिरी - कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्स रविवारपासून (दि.०६) सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घेतला आहे. महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दिपक माने यांनी याबाबत माहिती दिली. सध्या क्षमतेच्या 33 टक्के बुकिंग घेतली जाणार आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही बुकिंग होणार असून पर्यटकांना शासनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहेत.
या निर्णयामुळे आता वेळणेश्वर, गणपतीपुळे, सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर येथील हॉटेल्स सुरू केली जाणार आहेत. तर प्रतिबंधित क्षेत्रामधील पर्यटकांना मात्र यावेळी बंदी असणार आहे. शिवाय ज्या ठिकाणी विलगीकरण केंद्रांसाठी रिसॉर्ट आणि हॉटेलचा वापर केला गेला होता ती सर्व टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत.
हेही वाचा -वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत शासन उदासीन; रत्नागिरीतील याचिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे
हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि ई-पासबाबत काही नियम शिथील केल्यानंतर एमटीडीसीने कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला केवळ 33 टक्के बुकिंग केली जाणार असून टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ केली जाणार आहे. 33 टक्के ऑनलाईन बुकिंगला प्राधान्य दिले जाणार असून त्यानंतर काऊंटर बुकिंग केली जाणार आहे. पण, 33 टक्के ऑनलाईन बुकिंग पूर्ण झाली असल्यास काऊंटर बुकिंग मात्र केली जाणार नाहीत.
दरम्यान, पर्यटकांना सेल्फ डिक्लरेशनचा फॉर्म भरून देणे अनिवार्य असून पर्यटकाचे तापमान, त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील तपासली जाणार आहे. फेसमास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर अनिवार्य असून गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दिपक माने यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा -५ हजार रुपयांच्या लाचप्रकरणी दापोलीचे वनपाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात