महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिफायनरी उभारण्याचे कटकारस्थान कराल तर ते उधळून लावू - विनायक राऊत - नाणार रिफायनरी प्रकल्प

नाणार रिफायनरी विरोधी समितीकडून रविवारी राजापूरमधल्या तारळ येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार विनायक राऊत

By

Published : Sep 22, 2019, 6:01 PM IST

Updated : Sep 22, 2019, 8:52 PM IST

रत्नागिरी -रिफायनरीला विरोध किती आहे हे खरंच तुम्हाला पाहायचं असेल, तर याठिकाणच्या 14 गावांमध्ये येऊन लोकांची मते जाणून घ्या, पण दिशाभूल करणाऱ्या दलालांच्या फसव्या घोषणाबाजीला फसून जर रिफायनरी उभारण्याचे कटकारस्थान कराल तर ते उधळून लावण्याची ताकद आमच्या एकजुटीत आहे, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. ते राजापूरच्या तारळ येथील सभेत बोलत होते.

नाणार रिफायनरी विरोधी निषेध सभा

रिफायनरी विरोधकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. नुकत्याच पार पार पडलेल्या महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाणार रिफायनरी विरोधी समितीकडून रविवारी राजापूरमधल्या तारळ येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने यावेळी लोक उपस्थित होते. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार राजन साळवी, भाई सामंत यांच्यासह, अनेक गावांचे सरपंच, स्थानिक शेतकरी आणि मच्छीमार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि पुन्हा एकदा रिफायनरी विरोधाचे ठराव आणि असहमंतीपत्रे मुख्यमंत्र्यांना देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा -नाणार प्रकल्प रद्दच असल्याचा दिपक केसरकर यांचा निर्वाळा

राऊत म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती काय हे दाखवून देण्यासाठी ही सभा आहे. भर उन्हात एवढी लोक का एकत्र येत आहेत, या जनतेच्या भावनांचा सन्मान मुख्यमंत्र्यांनी करावा, त्यांना फसवणाऱ्या टोळक्याला बळी न पडता जनतेचा आवाज ऐकावा आणि त्यांना न्याय द्यावा. जर मुख्यमंत्र्यांनी दलालांच्या घोषणाबाजीला फसून हा प्रकल्प येथील जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला तर तो उधळवून लावू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

कोकणच्या विकासासाठी हा प्रकल्प तुम्ही आणू इच्छिता, मग कोकणातले अनेक सिंचन प्रकल्प का बंद आहेत, बांबूला भाव नाही, आंब्याला हमी भाव नाही, पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी पैसे नाहीत. कोकणच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या योजना मंजूर करायच्या नाहीत पण दलालांचे खिशे भरण्यासाठी आणि सौदे अरेबियाच्या राजपुत्राचे बंगले उभे करण्यासाठी तो रिफायनरी प्रकल्प कोकणच्या भूमीवर आणत आहात, तुमचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा -जीव गेला तरी नाणार रिफायनरी होऊ देणार नाही; ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत जो प्रकल्प रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली, त्याची वाच्यता करणे, चर्चा करणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेचा विरोधच, असे आमदार राजन साळवी यावेळी म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुखानी या प्रकल्पाच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे, त्यामध्ये तसूभरही फरक पडणार नाही, अशी ग्वाही साळवी यांनी दिली. चर्चा करायचीच असेल तर मुख्यमंत्र्यांनी समर्थकांना घेऊन या 14 गावांमध्ये यावे, आम्हीही त्यांच्याशी समोरासमोर चर्चेला करायला तयार आहे, असे भाई सामंत म्हणाले.

Last Updated : Sep 22, 2019, 8:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details