रत्नागिरी - राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे यांनी आज (22 मे) खेड तालुक्यातील बोरज येथील घोसाळकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तौक्ते चक्रीवादळामुळे ३३ केव्ही वीज वाहिनीचा धक्का बसून बोरज येथील पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सोमवारी सायंकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास बोरज जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ ही दुर्घटना घडली होती. प्रकाश गोपाळ घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना प्रकाश घोसाळकर असे या मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. आज जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार सुनील तटकरे आले होते. त्यावेळी बोरज येथे जाऊन घोसाळकर कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
घोसाळकर दाम्पत्याचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू, सुनील तटकरेंकडून कुटुंबीयांचे सांत्वन
तौक्ते चक्रीवादळामुळे वीजेचा शॉक लागल्याने खेड तालुक्यातील बोरज येथील प्रकाश गोपाळ घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना प्रकाश घोसाळकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आज खासदार सुनील तटकरे यांनी घोसाळकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
'कितीही शब्द दिले तरी सांत्वन होऊ शकत नाही'
'एका घरातील पितृछत्र आणि मातृछत्र एकाच वेळी हरपणे ही बाब अतिशय क्लेशदायक आहे. या कुटुंबीयांना कितीही शब्द दिले तरी सांत्वन होऊ शकत नाही. गेलेले जीव काही परत येत नाहीत. पण कुटुंबाला लागणारे जे बळ आहे, ते आम्ही सर्वजण त्या ठिकाणी देऊ', अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी घोसाळकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा -अकरावीचे प्रवेश सुरू करणाऱ्या महाविद्यालयांना शिक्षण संचालकांनी झापले