रत्नागिरी -नाशिकमधील महाविकास आघाडीतील नेत्यांमधील वादप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण केली आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप कांदे यांनी केला आहे.
'थोड्या कुरबुरी असू शकतात'
खासदार तटकरे म्हणाले, की छगन भुजबळ हे प्रदीर्घ अनुभवी असे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कुठलाही अन्याय होणार नाही. नाशिकचे शिवसेनेचे आमदार सुभाष कांदे यांचे नेमके काय प्रकरण आहे, यासंदर्भात आपल्याला कुठलीही माहिती नाही. तीन पक्षांचे सरकार राज्यामध्ये अनेक प्रयत्नांनंतर स्थापन झाले आहे. थोड्याफार प्रमाणात कुरबुरी या आघाडीमध्ये होऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नावर कांदे यांनी थेट वक्तव्य करणे हे आघाडीच्या एकतेच्या दृष्टीने योग्य राहणार नाही.
'चर्चा करावी'
राज्य पातळीवरच्या समन्वय समितीमध्ये या संदर्भातील चर्चा नक्की होऊ शकते. कांदे यांनी न्यायालयात थेट धाव घेतली असेल तर ते आघाडीच्या दृष्टीने योग्य आहे, असे मला वाटत नाही. प्रश्न असू शकतात, चर्चा करावी लागेल. त्यामुळे एकत्र बसून आघाडीच्या माध्यमातून यातून मार्ग काढला पाहिजे, असे तटकरे यावेळी म्हणाले.