रत्नागिरी - जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार मागील 24 तासात जिल्ह्यात 662 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातील 325 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 337 रुग्ण अँटिजेन चाचणी केलेले आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 20 हजार 278 झाली आहे. तर मंगळवारी जिल्ह्यात तब्बल 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे अंमलात आणाव्या लागणार आहेत.
बाधित रुग्णांचा उच्चांक
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण गेल्या काही दिवसात
सापडू लागले आहेत. मंगळवारी आलेल्या आकडेवारीने तर बाधित रुग्णांचा उच्चांक गाठला आहे. नव्याने 662 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 20 हजार 278 वर जाऊन पोहचली आहे.
मंगळवारी सापडलेल्या 662 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 153 , दापोली 62 , खेड 56 , गुहागर 132 , चिपळूण 94 , संगमेश्वर 81 , राजापूर 50 आणि लांजा तालुक्यात 34 रुग्ण सापडले आहेत .
12 जणांचा मृत्यू
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 606 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.98 % आहे.