रत्नागिरी -निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर सुरळीत व्हावे यासाठी सरकार वेगात काम करत आहे. वाढीव मदत मिळण्यासाठी बदललेल्या निकषानुसार आत्तापर्यंत 2 हजार 900 पेक्षा अधिक बाधितांना साडे सात कोटींची रक्कम भरपाई म्हणून देण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली. कोकण कृषी विद्यापीठात त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार आणि संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण प्रशासनासह बँकांचे अधिकारी देखील येथेच मुक्कामी राहून काम करत आहेत. वेगवेगळ्या बँकांचे अधिकारी दापोलीत ठाण मांडून बसले असून लवकरात लवकर नागरिकांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काल दिवसभरात 2 हजार 968 अंशत: बाधित घरांना 15 हजार प्रमाणे 7 कोटी 58 लाख रुपयांची मदत संबधित व्यक्तींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. तर आज 167 पूर्णतः नुकसान झालेल्या घरांना प्रत्येकी 1 लाख 60 हजार रुपये प्रमाणे मदत नागरिकांच्या खात्यात जमा केल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.