रत्नागिरी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी दौर्यावर आले असून शनिवारी त्यांची जाहीर सभा होणार आहे. रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडांगणावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे यांचे शुक्रवारी संध्याकाळी रत्नागिरीत आगमन झाले. बारसू रिफायनरीवरुन राजकारण पेटले असताना राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा होत आहे. त्यामुळे राज ठाकरे या सभेथ कोणती भूमीका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यासह कोकणात आज उद्धव ठाकरे हे देखील बारसूतील आंदोलकांना भेटणार आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
मुंबईतील कार्यकर्त्यांची फौज रत्नागिरीत दाखल :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची रत्नागिरीतील ही पहिलीच सभा असल्याने ही सभा यशस्वी करण्यासाठी मुंबईतील नेते, कार्यकर्त्यांची फौज रत्नागिरीत दाखल झाली आहे. तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी देखील सभा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. शहराच्या प्रवेशद्वारापासून मोठे बॅनर, दुभाजकावरील पोलवर मनसेचे झेंडे फडकवण्यात आले आहे.
तब्बल वीस हजारहून अधिक खुर्च्या :शहरातील आठवडाबाजार परिसरातील दिवंगत प्रमोद महाजन मैदानावर मोठ्या व्यासपिठासह भव्य स्क्रिन उभारण्यात आल्या आहेत. मैदान मनसे झेंड्यानी सजविण्यात आले आहे. तब्बल वीस हजारहून अधिक खुर्च्या या मैदानावर राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी येणार्या नागरिकांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या खुर्च्याही कमी पडतील, असा दावा मनसेचे पदाधिकारी करीत आहेत.