रत्नागिरी :राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. अजित पवार आपल्या आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे म्हटले जात आहे. काही आमदार पुन्हा मातोश्रीकडे येण्यास इच्छुक असल्याचेही म्हटले जात आहे. याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, ज्या दिवशी अजित पवार यांनी शपथ घेतली त्या दिवसापासूनच शिंदे गटातील आमदारांमध्ये चुळबूळ वाढली आहे.
8 ते 10 आमदार संपर्कात : अनेकजण मातोश्रीकडे साद घालत आहेत. जवळपास अशा 8 ते 10 आमदारांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संपर्क साधला आहे. मातोश्रीची क्षमा मागुन ते परत येण्याची इच्छा व्यक्त करीत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यातले हे आमदार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. तसेच या आमदारांना परत घेऊ नये असे बहुतांश पदाधिकाऱ्यांचे मत आहे, मात्र अंतिम निर्णय उद्धव साहेब ठाकरेंचा असेल असे देखील विनायक राऊत यावेळी म्हणाले.
राज्यात गलिच्छ राजकारण सुरू : शिंदे गटातील अनेक आमदारांनी संपर्क साधला आहे. मातोश्रीवर माफी मागण्यासही ते तयार आहेत. मात्र गद्दारांना परत घेऊ नका, अशी अधिकाऱ्यांची भूमिका आहे. आठ ते दहा आमदारांशी थेट संपर्क साधला असून, अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असेही राऊत म्हणाले. सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करायला शब्द नाहीत. गलिच्छ राजकारण सुरू आहे. हा महाराष्ट्राचा कलंक आहे. गलिच्छ राजकारण आहे. फुटीचे काळेपण महाराष्ट्रात पोहोचले आहे. केवळ कुटुंबच नाही तर गलिच्छ राजकारणाचाही परिणाम राज्यावर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे तुच्छतेने पाहिले जात असल्याचे ते म्हणाले.