महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाकरमान्यांना आपल्या गावी येण्यासाठी दोन दिवस परवानगी द्या, आमदार शेखर निकम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - MLA shekhar nikam

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडॉऊन घोषीत केला आहे. त्यामुळे मुंबईत काम करणारे कोकणातील चाकरमानी अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी चिपूळणचे आमदार शेखर निकम सरसावले आहेत.

आमदार शेखर निकम
आमदार शेखर निकम

By

Published : Mar 27, 2020, 2:22 PM IST

रत्नागिरी -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी चिपळूणचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम सरसावले आहेत. नोकरीनिमित्त मुंबईत गेलेल्या चाकरमान्यांना आपल्या कुटुंबासह गावात येण्यासाठी दोन दिवस परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

आमदार शेखर निकम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

काय म्हटले पत्रात? -
संपूर्ण देशात व राज्यात संचारबंदी केल्यापासून मुंबईत नोकरी निमित्ताने आलेल्या कोकणातील अनेक चाकरमान्यांचे फोन येत आहेत. काहीही करा, मात्र आम्हाला सोडायला मदत करा, अशी विनंती चाकरमानी करत आहेत. कोकणातील अनेकजण मोठ्या प्रमाणात विरार, नालासोपारा तसेच मुंबईमधील चाळी सिस्टिम तसेच झोपडपट्टी भागात राहतात. अनेक झोपडपट्टीमध्ये शौचालय देखील सार्वजनिक आहेत. मुंबईमध्ये वाढत असलेले गर्मीचे प्रमाण पाहता सद्यस्थितीत १० बाय १० च्या एका खोलीत ४ ते ५ माणसे एकत्र राहत आहेत. लहान मुलांनाही खूप त्रास होत आहे. चाकरमान्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. कोकणातील वाडी संस्कृती अजूनही सक्षम असल्याने वाडीने एकदा जर का निर्णय घेतला, तर घरातून कोणीही व्यक्ती हे विनाकारण बाहेर पडणार नाहीत. आपण कोकणातील मुंबईत राहत असलेल्या चाकरमान्यांना गावी येण्यासाठी दोन दिवसांची संधी दिलीत व प्रत्येक तालुक्यातील चेक नाक्यावर त्यांची तपासणी करून त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली, तरी अनेक कुटुंब सुखरूप गावी पोहोचतील, असे आमदार शेखर निकम म्हणाले.

कोकणातील माणसे ही घरात भले चटणी भाकर , भातावर सुकटीचा कालवण खाऊन दिवस काढतील. मात्र, आपल्या सरकारचे आदेश धाब्यावर नेणार नाहीत. हा माझा विश्वास आहे. माझ्या विनंतीचा सरकारने शक्य असल्यास योग्य तो विचार विनिमय करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार निकम यांनी केली आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details