रत्नागिरी :मोठ्या कष्टाने हे घर उभारले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने केले गेलेले मोजमाप वेदनादायी होते, अशा भावना आमदार राजन साळवी यांनी बोलून दाखवल्या. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे रडायचे नाही, आता लढायचे असा निर्धार देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला. राजन साळवी यांच्या घरी अधिकारी मोजमाप करण्यासाठी आले, त्यावेळी साळवी देवपूजेला बसलेले होते. दरम्यान यापूर्वी देखील राजन साळवी यांच्या जुन्या घराचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर आज आमदार राजन साळवी यांच्या राहत्या घराचे मूल्यांकन करण्यात आले.
प्रकरण काय : गेले काही दिवस आमदार राजन साळवी यांची रायगड एसीबी चौकशी सुरू आहे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. राजन साळवी यांना उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता खर्चा संदर्भात जवाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. रायगड एसीबी कार्यालयात त्यानुसार आमदार राजन साळवी यांनी तीन वेळा चौकशीसाठी हजेरी लावली होती. राजन साळवी यांचे स्वीय साहाय्यक सुभाष मालप यांची देखील चौकशी झाली. दरम्यान राजन साळवी यांनी आमदार झाल्यापासून म्हणजेच 2009 पासून आमदार निधीतून आतापर्यंत खर्च केलेल्या निधीची आणि कामांची माहिती जिल्हा नियोजन विभागाकडे रायगड एसीबीने मागविली, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली होती.