रत्नागिरी : चिपळूणमध्ये सोमवारी शिवसेनेचा निर्धार मेळावा ( Shiv Sena Nirdhar Melava in Chiplun ) झाला. यावेळी शिवसेना प्रवक्ते भास्कर जाधव यांनी भाजप आणि बंडखोर आमदारांचा आपल्या आक्रमक शैलीत समाचार घेतला. या मेळाव्याला माजी खासदार अनंत गीतेंसह आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भास्कर जाधव यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका ( MLA Bhaskar Jadhav Strongly Criticized BJP ) केली. मुख्यमंत्री असताना विधानसभेत जाहीरपणे मी हिंदुत्ववादी असल्याचे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी जाहीर सांगितले होते.
पंतप्रधानांना सवाल : आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींना सवाल ( Prime Minister Modi is also a Target ) केला की, ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी विधानसभेत मी हिंदुत्ववादी आहे, असे म्हटले होते. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी हिंमत संसदेमध्ये दाखवतील का? ज्या शिवसेनेला भाजप, महाराष्ट्रात तुम्ही मोठे भाऊ आणि केंद्रात शिवसेना लहान भाऊ, असे म्हणायची, त्याच भाजपने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाने राजीनामा दिल्यानंतर एकमेकांना पेढे भरवले, अशी टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली.
भाजपने खेळला रडीचा डाव : अनेकदा सरकार पडेल अशा प्रतिक्रिया आल्या पण सरकार पडले नाही, ईडीच्या कारवाया झाल्या तरीही सरकार पडले नाही, मंत्री जेलमध्ये टाकले तरी सरकार पडले नाही, त्यानंतर भाजपने रडीचा डाव खेळत आमदार फोडले, असे जाधव यावेळी म्हणाले. बंडामध्ये आमचा काही संबंध नसल्याचे सांगणाऱ्या भाजपने प्रत्यक्ष बंडखोरांना कशी मदत केली याचा पाढा स्वतः एकनाथ शिंदेंनी वाचल्याच्या दाखला देत भास्कर जाधव यांनी भाजप व बंडखोरांवर टीका केली.