रत्नागिरी - सध्या कोकणात भातशेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कोकणी माणूस शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहे. काही लोकप्रतिनिधी सुद्धा शेतीच्या कामात व्यस्त असलेले पहायला मिळत आहेत. गुहागरचे आमदार भास्कर जाधव हेही आपल्या शेती कामांमध्ये व्यस्त आहेत. 'शेती आपली अन्नदाता आहे; त्यामुळे तिची पूजा केली पाहिजे', अशा भावना आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केल्या.
चिपळूण तालुक्यातील तुरंबव हे भास्कर जाधव यांचे गाव आहे. त्यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या शेती केली जाते. त्यामुळे भास्कर जाधव यांनाही अगदी लहानपणापासून शेतीची आवड. त्यामुळे राजकारणात असलो तरी शेती पाहिली पाहिजे, तिच्याकडे दुर्लक्ष नको असं भास्कर जाधव सांगतात. सध्या शेतीचं आधुनिकीकरण होत आहे. त्यामुळे यापूर्वी नांगर धरणारे भास्कर जाधव सध्या अगदी ट्रॅक्टर चालविण्यापासून ते भाताचं आवण काढणे, भात लावणे अशा शेती कामांमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळतात.
आपल्या शेती बद्दल सांगताना भास्कर जाधव म्हणतात की, 'आम्ही पिढ्यानपिढ्या शेती करतो, यामध्ये कधीही खंड पडू दिलेला नाही, सध्या अनेकांचं शेतीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. पण आम्ही कधीही रेशनिंगचं धान्य आणत नाही, शेतात सेंद्रिय खतावर पिकवलेलंच धान्य आम्ही खातो, शेतातलं धान्य खायचं असेल तर स्वतःच्या शेतात राबलं पाहिजे. हा पुढच्या पिढीला वारसा माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना दिला, वडिलांनी तो आम्हाला दिला, मी आणि माझ्या भावांनी तो वारसा मुलांना द्यायला सुरुवात केलीय.
आमदार भास्कर जाधव शेतीकामात व्यस्त 'आमची मुलं सुद्धा शेतीत राबत असतात. 'आज सगळं ऐश्वर्य आहे, कशाची कमतरता नाही. मात्र शेती आपली अन्नदाता आहे, त्यामुळे तिची पूजा केली पाहिजे, तिचं जतन केलं पाहिजे, या विचाराने आमचं कुटुंब शेतीत राबतं'. गेल्यावर्षी पायाला दुखापत झाल्यामुळे शेतात जाता आलं नाही. लहानाचा मोठा झालो आणि एवढ्या वर्षांत मला फक्त गेल्यावर्षी शेतात जाता आलं नाही याचं दुःख वाटलं. पण यावर्षी मी सुदैवाने ठणठणीत असल्याने पुन्हा शेतात आलो असल्याचेही भास्कर जाधव यांनी सांगितले.