रत्नागिरी - भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात घडलेल्या घटनेनंतर काल(रविवारी) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत रत्नागिरीतील नवजात शिशू बालकांच्या विभागाची त्यांनी पाहणी केली. नवजात शिशू विभाग आणि प्रसुती विभागाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.तर जिल्हा रुग्णालयाचे तब्बल ३० वर्ष स्ट्रक्टरल ऑडिटच झाले नसल्याचेही समोर आले. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील उणिवा जाणून घेत त्यांनी अधिकाऱ्यांना यावर त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. चार दिवसात फायर ऑडिटसह स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही तर घरी पाठवेन, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
फायर ऑडिटची घेतली माहिती -
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागून १० बालकांचा गुदमरुन मृत्यू झाला. यानंतर राज्यातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला. सर्व रुग्णालयांनी तत्काळ फायर ऑडिट काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी उदय सामंत यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देवून तेथील फायर ऑडिटची माहिती घेतली. परंतु जिल्हा रुग्णालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी यावेळी उपस्थित राहिले नाहीत.