रत्नागिरी - यावर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच यासाठी समन्वय समितीची स्थापना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकही शनिवारी आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली.
रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार - उदय सामंत वादाच्या ठिकाणी समन्वय समितीची गरज
ज्या ठिकाणी वाद असतील, किंवा समन्वय होत नसेल, अशा ठिकाणी महाविकास आघाडीची समन्वय समिती समन्वय घडवून आणेल, असे सामंंत म्हणाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
90 टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी
दरम्यान, 479 पैकी 450 ग्रामपंचायती या आम्हीच जिंकू, अशा विश्वात सामंत यांना आहे. तसेच जवळपास 90 टक्के ग्रामपंचायती या आमच्याच ताब्यात असतील, असे त्यांनी म्हटले. तसेच स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या भाजपाला शुभेच्छा देत असल्याचा, टोला त्यांनी लगावला.
'रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोनमधून वगळण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात'
रत्नागिरी जिल्ह्याला ग्रीन झोनमधून वगळण्याबाबतचा सकारात्मक निर्णय येत्या काही दिवसात होईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरी ग्रीन झोन जिल्हा घोषित झाल्यामुळे सध्या यावर जोरदार चर्चा सुरू आहे. यातून रत्नागिरीला वगळण्यात यावं, यासाठी लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांना निवेदनही दिले होते. मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन झोनचा कोणताही परिणाम हा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासावर होणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोनमधून वगळण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये नगरविकास खात्याच्या मंत्र्यांबरोबर बैठक होईल आणि ग्रीन झोनच्या बाबतीत सकारात्मक निर्णय जिल्ह्याच्या दृष्टीने घेतला जाईल, असे ते म्हणाले.