रत्नागिरी -मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला. या सायबर हल्ल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना लिंक पोहोचली नाही आणि परीक्षांना मुकावे लागले. दरम्यान, या सायबर हल्ल्याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. हे नक्की कुठून सुरू झालं, त्याच्या मुळाशी आम्ही पोहचणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
'मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवरील सायबर हल्ला प्रकरणाच्या मुळाशी जाणार' हेही वाचा -जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर; एरंडोलचा आकाश त्रिवेदी भारतातून २२६वा
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉलच्या) तिसऱ्या वर्षाच्या बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा 3 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. मंगळवारी या परीक्षेचा दुसरा पेपर होता. मात्र सर्व्हरवर सायबर हल्ला झाला आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक पोहोचली नाही. याबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, की सिस्टिम कोलॅप्स करण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता. देशातले तज्ज्ञ याचा शोध घेत असल्याचे सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हा सायबर हल्ला कसा, याबाबत बोलताना सामंत म्हणाले, की 9 हजार विद्यार्थ्यांची परीक्षेला बसले असताना एकाच वेळी अडीच लाख जणांनी ती लिंक ओपन केल्याचं दिसून आलं. या सर्व प्रकाराची चौकशी सुरू असून, या सर्व प्रकाराच्या मुळापर्यंत आम्ही जाऊ.
हेही वाचा -कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर अॅन्जिओप्लास्टी, मिळाले जीवनदान