रत्नागिरी - जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश काढण्यात आला आहे. याबाबत बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, की मनाई आदेश काढताना कोणताही दबाव जिल्हाधिकारी यांच्यावर नाही. त्यांना अधिकार आहे, त्यांना योग्य वाटले असेल म्हणून त्यांनी मनाई आदेश काढला असेल, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी रत्नागिरीत बोलताना दिली आहे.
'राणेंमुळे जमावबंदीचे आदेश नाहीत'
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्यामुळे अशाप्रकारचा जमावबंदीचा आदेश काढण्यात आला का, संबंधी प्रश्न विचारण्यात आला, त्याला सामंत यांनी उत्तर दिले. जमावबंदीचा आणि राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा संबंध नाही. जिल्हाधिकाऱ्यांवर यासंबंधी कोणताही दबाव नाही, असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले.
'अग्रलेखाविषयी बोलणार नाही'
सामनामध्ये जो अग्रलेख आला त्याबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, की संजय राऊत यांना सिंधुदुर्गमधील जी काही प्रकरणे झाली आहेत, त्याबाबत माहिती असल्यामुळेच त्यांनी तो अग्रलेख लिहिला असेल. त्यामुळे त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे उदय सामंत यावेळी म्हणाले.