रत्नागिरी - 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेला सर्वांनी सहकार्य केले तर महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मोहिमेच्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी व त्याबाबतची चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासमवेत झूम ॲपद्वारे आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री उदय सामंत यांनी यावेळी, ज्या रुग्णांना हॉस्पीटलमध्ये न जाता हॉटेलमध्ये क्वारंटाइन होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी खासगी हॉटेल मध्ये बेडचे दर ठरवून पेड क्वारंटाइनची सुविधा तात्काळ सुरु करण्याचे निर्देश दिले. तसेच खेड नजीक खासगी हॉटेलमध्ये पेड क्वारंटाईन सुविधा सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. रत्नागिरीतील महिला रुग्णालयाचे काम सुरु असून रत्नागिरी महिला रुग्णालय पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे. रत्नागिरीसाठी लवकरच १५ अॅम्ब्यूलन्स मिळणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी इन्दुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापुरकर यांच्यासह जिल्हयातील लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.