रत्नागिरी - सरासरी पद्धतीने वीजबिले न देता मीटर रिडींगप्रमाणेच बिले द्यावीत आणि गणेशोत्सवात अखंड वीज सुरू ठेवावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिल्या. सामंत यांनी रत्नागिरीत महावितरणच्या कोकण परिमंडळाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला सामंत यांच्यासोबत नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, महावितरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमध्ये मीटर रिडींग बंद ठेवण्यात आले होते. जून महिन्यात पुन्हा रिडिंग घेणे सुरू करण्यात आल्यानंतर ग्राहकांना तीन महिन्यांची एकत्रित वीजबिले पाठवण्यात आली. मात्र, नेहमी येणार्या बिलांपेक्षा ही बिले अधिक रकमेची असल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला. महावितरणचे कर्मचारीही व्यवस्थित उत्तरे देत नसल्याच्या काही तक्रारी आल्या. याचे पडसाद आज घेतलेल्या आढावा बैठकीत उमटले. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत महावितरणच्या कर्मचाऱयांना विचारणा केली. यापुढे सर्वच बिले रिडींगप्रमाणे काढण्याच्या सूचना सामंत यांनी अधिकाऱयांना केल्या.