रत्नागिरी-जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, प्रदूषणविरहीत प्रकल्पाच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट म्हणजेच नवप्रवर्तन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुढील चार महिन्यात जिल्ह्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) केला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
सामंत म्हणाले, नवप्रवर्तन योजनेची अंमलबजावणी केवळ परदेशात झाली आहे. महाराष्ट्रात प्रथमच ही योजना राबविली जात आहे. यासाठी उद्योग मंत्रालयाबरोबरच उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पर्यटन खाते हे एकत्रितरित्या काम करणार आहेत. स्थानिक जनतेने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या प्रकल्पांना पाठिंबा देण्याची आवश्यकता असून जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीचे नवे पाऊल महाविकास आघाडीच्या सरकारने टाकले आहे. यामाध्यमातून एक लाख नोकऱ्यांसह उद्योग रिसर्च सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन विद्यापीठ, शाळा जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याची माहितीही उदय सामंत यांनी यावेळी दिली.