रत्नागिरी -राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना तुम्ही शरद पवारांची भेट घ्या, असा सल्ला राज्यपालांनी राज ठाकरे यांना दिला होता. यावरून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत त्यांना टोला लगावला आहे. सत्तार हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. आज मंडणगडमध्ये त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ई टीव्ही भारतशी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत साधलेला संवाद शरद पवारांची आठवण अनेकांना येते
यावेळी सत्तार म्हणाले की, शरद पवार यांच्याकडे राज्यपाल यांनी बोट दाखवलं याचा अर्थ असा नाही की बाकीच्या सरकारवर त्यांचा विश्वास नाही, राज्यपालांचा विश्वास सरकारवर आहे. शरद पवार हे सरकारचा केंद्रबिंदू आहेत. शरद पवार यांची आठवण फक्त राज्यपाल महोदयांनाच येत नाही, तर देवेंद्रजी, अमितजी शाह यांनाही त्यांची आठवण येत असेल, मोदी यांना शरद पवार यांची आठवण येत असेल, असा टोलाही अब्दुल सत्तार यांनी यावेळी लगावला. आमच्या आघाडीच्या नेत्यांबद्दल राज्यपाल महोदय आठवण काढतात हे चांगले आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांंच्या नावाबाबत कोणतीही कुरबूर आघाडी सरकारमध्ये नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
विखे-पाटील यांनी असे बोलायला नको होते
सरकार चालविण्याची धमक आहे मग केंद्राकडे बोट का दाखवता? अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. याबाबत बोलताना सत्तार यांनी विखे पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. विखे पाटील यांनी असे बोलण्याऐवजी, राज्य सरकारचा केंद्राकडे जेवढा पैसा आहे, तो पैसा आम्ही मोदी साहेबांना सांगून तो राज्य सरकारला देऊ असे म्हणायला हवे होते, असं म्हणत सत्तार यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. केंद्र सरकार दुजाभाव करत आहे, महाराष्ट्राकडून फक्त घ्यायचं द्यायचं मात्र काही नाही असं मी आयुष्यात कधी पाहिलं नाही, त्यामुळे विखे पाटील यांना फोन करून तुम्ही असं बोलायला नको होतं, असं सांगणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं.
सत्तार यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका
राधाकृष्ण विखे पाटील हे पहिले आंब्याचा झाडाखाली बसलेले होते. आता बाभळीच्या झाडाखाली गेलेत. त्यामुळे थोडाफार त्रास तर होणारच, असा टोलाही सत्तार यांनी यावेळी विखे पाटील यांना लगावला.