रत्नागिरी - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि अनेकांनी आपल्या गावाची वाट धरली. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अनेक चाकरमानी कोकणातल्या आपल्या गावी आलेले आहेत. सध्या हे चाकरमानी गावात नेमके काय करताहेत? याचा आढावा घेतला असता, यातील अनेक चाकरमानी सध्या शेतीच्या कामात गुंतल्याचे दिसून आले. नोकरी-धंद्यामुळे अनेक वर्षे शेतीकडे लक्ष देता आले नाही, आवड असूनही सवड मिळत नव्हती. मात्र, आता हे सर्वजण मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून पुन्हा एकदा शेतीत रमले आहेत.
LOCKDOWN : चित्र रेखाटणारे 'ते' हात पुन्हा राबू लागले शेतात
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथील अर्जुन माचिवले हे देखील गेल्या काही वर्षांपासून नोकरीसाठी मुंबईत आहेत. ते एक उत्तम चित्रकार असून गेली 21 वर्ष ते मुंबईतल्या घाटकोपर येथील एका शाळेत कला शिक्षक आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व कामे ठप्प झाल्याने ते पुन्हा एकदा शेतीत रमले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथील अर्जुन माचिवले हे देखील गेल्या काही वर्षांपासून नोकरीसाठी मुंबईत आहेत. ते एक उत्तम चित्रकार असून गेली 21 वर्ष ते मुंबईतल्या घाटकोपर येथील एका शाळेत कला शिक्षक आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अनेक कलाप्रदर्शनांमध्ये त्यांनी सहभागही घेतला आहे. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले आणि सर्वच थांबले. गेल्या दोन महिन्यांपासून अर्जुन माचिवले आपल्या गावी आले आहेत. गावी करायचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच. चित्रकलेची आवड ते जोपासत आहेतच, पण याशिवाय सध्या ते वडिलोपार्जित शेतीत रमले आहेत. शेतीची आवड असूनही कामानिमित्त मुंबईत असल्याने त्यांना गावी शेतीच्या कामासाठी येण्यास वेळ मिळत नसे. गावी असणारी घरातील मंडळी शेती करतात. मात्र, यावर्षी अर्जुन यांचीही घरच्यांना शेतीच्या कामात साथ मिळत आहे. लॉकडाऊनच्या निमित्ताने पुन्हा एकदा शेतीत रमल्याने एक वेगळे समाधान मिळत असल्याचे अर्जुन सांगतात.
गेल्या काही वर्षांमध्ये कोकणात शेतीचा टक्का कमी झाला आहे. शेतीत अधिकाधिक कष्ट घेऊनही उत्पन्न म्हणावे तसे नाही. त्यातच सुशिक्षितवर्ग हा रोजगाराच्या मागे धावत मोठ्या शहरात गेल्यानंतर त्या शहरातच स्थायिक होऊ लागला. त्यामुळे एकेकाळची सुपीक शेती ओसाड बनली. यामुळे शेती क्षेत्रात आपोआपच घट झाली आणि उत्पन्नही घटले. मात्र, आता कोरानाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने गावची वाट धरली आणि आपल्या ओसाड पडलेल्या शेतीत लक्ष घातले. त्यामुळे अर्जुन माचिवले यांच्यासारखे अनेक चाकरमानी सध्या शेतीच्या कामांत व्यस्त आहेत.