रत्नागिरी- तब्बल 18 टक्के व्याजदराने गुंतवणुकदारांना परताव्याचे आमिष दाखवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप भोवती कायद्याचा फास आवळण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील गुंतवणुकदारांना मातृभूमी कंपनीच्या नावाखाली गंडा घालण्यात आला आहे. या नॉन बँकीग कंपनीने महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकात करोडोंच्या ठेवी गोळा करत गुंतवणुकदारांना चुना लावला आहे. ठेवीच्या रक्कमेची परतफेड होत नसल्याने अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील गुंतवणुकदारांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. करोडोंची माया गोळा करणाऱ्या कंपनीच्या 4 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मातृभूमी कंपनीचा लोकांना करोडो रुपयांचा गंडा, संचालकांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनंतर कंपनीचे संचालक प्रदिप गर्ग, संजय हेमंत बिश्वास, मिलिंद अनंत जाधव आणि विनोदभाई पटेल या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मातृभूमी कंपनीकडून फसवणूक झाल्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 404 गुंतवणुकदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारदारांची 2 कोटी 33 लाख 97 हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तर पोलिसांनी गुन्हा दाखल असलेल्या चौघांपैकी हेमंत बिश्वास आणि विनोदभाई पटेल या दोघांना गुजरातमधील सुरत येथून अटक केली आहे. उर्वरित दोघेजण फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत.
गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर तब्बल 18 टक्के व्याजदर, गुंतवणुक करणाऱ्या एजंटलाही 5 टक्के रक्कम, कंपनीच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये 100 रुपये दरमहा गुंतवणुक केली अनं अपघाती मृत्यू झाल्यास ८० हजार रुपये, अशा आकर्षक नॉन बँकिंग कंपनीच्या जाहिरातीला राज्यातील अनेक फसले आहेत. मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून हे आमिष दाखवून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे मोठे कार्यालय थाटण्यात आले होते. २००९ मध्ये हे कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्यावेळी रत्नागिरीसह राज्यातील 15 जिल्ह्यात मातृभूमी कंपनीच्या माध्यमातून या कंपनीने आपले पाय रोवले. कंपनीने पहिले काही वर्षे ठरलेल्या आकर्षक दराने ठेवीदारांना पैसे परत दिले. मात्र, नंतर हळूहळू कंपनीने मातृभूमी ग्रुप आँफ कंपनीच्या नावाखाली विविध 10 कंपन्या स्थापन केल्या.
10 कंपन्यांची नावे -
- मातृभूमी ईन लिमिटेड
- मातृभूमी रियलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड
- मातृभूमी एक्झॉटिक हॉस्पीटीलीटी
- मातृभूमी डेअरी
- मातृभूमी फार्म अॅण्ड रिसोर्टस
- मातृभूमी टुर्स अॅण्ड हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड
- मातृभूमी इन्शुरन्स सर्व्हिसेस
- मातृभूमी पब्लिकेशन
- मातृभूमी फाऊंडेशन
- मातृभूमी फॅब्रिकेशन्स
मातृभूमी कंपनीने महाराष्ट्रात बोरिवली, चिपळूण, डहाणू, बोयसर, हिंगोली, कोल्हापूर, कुडाळ, लातूर, मंडणगड, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, रायगड, सांगली या ठिकणी आपली झोनल ऑफिस सुरु केली होती.