रत्नागिरी - मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी मराठा समाज आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. रत्नागिरीमध्ये देखील मराठा समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली. यावेळी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सध्या आम्ही निवेदन देत असलो तरी, आम्ही यापुढे आरक्षणासाठी आक्रमक होऊ, अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती आदेश दिला आहे. आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयामुळे मराठा समाजात प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला आहे. मेहनतीने मिळविलेले यश सहजासहजी वाया जाऊ नये, यासाठी समाज बांधवांनी आंदोलनाच्या हालचाली पुन्हा सुरू केल्या आहेत. हक्काच्या आरक्षणासाठी विविध स्तरावर बैठका सुरू झाल्या आहेत. न्यायालयीन निर्णय, शासनाची भूमिका याबाबत समाजाने निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरीतही आजमराठा समाजबांधवांनी निदर्शने केली.