रत्नागिरी -राजापूर तालुक्यातील माडबनच्या सड्यावरील अणुऊर्जा प्रकल्पाच्या कंपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री आग लागल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. या प्रकल्पात प्रवेश बंद असल्याने नेमकी आग कशी लागली, याबाबत माडबनसह परिसरात जोरदार चर्चा होती. मात्र या आगीमुळे आंबा बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे.
जैतापूरच्या आगीमध्ये आंब्याची अनेक झाडे जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
गुरुवारी रात्री जैतापूर अणुउर्जा प्रकल्प परिसरात ही आग लागली. ही आग इतकी मोठ्या प्रमाणात होती की, आजूबाजूचा परिसर पुर्णपणे जळून खाक झाला आहे. आंब्याची अनेक कलमे जळून खाक झाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अणुउर्जा प्रकल्पासाठी आरक्षित जागा संपूर्णपणे सिंमेटचे कंपाऊंड घालून बंदिस्त करण्यात आली आहे. या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. केवळ प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असतात. या प्रकल्पाला विरोध झाल्याने या प्रकल्पाचे काम पुढे सरकलेले नाही. केवळ दोन इमारती सद्यस्थितीत आतमध्ये उभ्या आहेत.
गुरूवारी सायंकाळच्या सुमारासच कंपाऊंडच्या आतील गवताने पेट घेतला होता. सुरक्षा रक्षकांनी ही आग विझवली होती. मात्र सायंकाळी उशिरा पुन्हा याठिकाणी आगीच्या ज्वाळा दुरून दिसू लागल्या. लगतच्या ग्रामस्थांमध्ये या आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे भीती निर्माण झाली. सड्यावर हे कंपाऊंड असले तरी दुरून दिसणाऱ्या आगीच्या प्रचंड भीषणतेने ही आग मानवी वस्तीपर्यंत पसरण्याच्या भीती ग्रामस्थ व्यक्त करत होते. सायंकाळी उशीरानंतर जेव्हा ही आग भडकत गेली, तेव्हा याची नाटे पोलीस स्थानकातील सहा.पो.निरीक्षक दिलीप काळे यांनी तत्काळ फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले.
त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. मात्र बंब पोहोचेपर्यंत आणि थोडासा पाऊस सुरू झाल्याने ही आग रात्री साडेनऊ वाजेपर्यंत बरीच आटोक्यात आली. प्रकल्पाच्या कंपाऊंडच्या आत अनेक विद्युत खांब असल्याने ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज नाटे पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या आगीमुळे आंबा बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..