रत्नागिरी - लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता गुरुवारी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. दरम्यान, एनडीएचा घटक पक्ष असणाऱ्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने त्यांचा जाहीरनामा आज स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला आहे. कारण, महाराष्ट्र स्वाभिमानचा एनडीएला पाठिंबा असला तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात मात्र तो एनडीचा दुसरा महत्वाचा घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
माझं कोकण, माझा स्वाभिमान..! महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध - narayan rane
महाराष्ट्र स्वाभिमानाचा जाहीरनामा प्रसिद्ध... उमेदवार निलेश राणेंनी पत्रकार परिषदेत दिली जाहीरनाम्याची माहिती.... कोकणाच्या विकाससह शेतकरी आणि मच्छिमारांच्या समस्या सोडवण्याची दिली आश्वासने
स्वाभिमानी महाराष्ट्रच्या जाहिरनाम्यात माजी मंत्री कै. ल.र. हातणकर यांचे राजापूर येथे स्मारक उभारण्यात आश्वासन देण्यात आले आहे. तसेच लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला १०० कोटी मिळवून देणे, इको सेन्सिटिव्ह झोनमधून निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जातील. याचबरोबर स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, कृषी क्षेत्रास चालना, पर्यटन वाढीस उत्तेजना, बचतगट सक्षमीकरण, रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल, कोकण रेल्वे, गड संवर्धन अशा अनेक मुद्द्यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.
या मतदारसंघात निलेश राणे विरुद्ध शिवसेनेचे विद्ममान खासदार विनायक राऊत याच्यात सामना रंगणार आहे.
काय आहे जाहीरनाम्यात-
- हापूसच्या उत्पादकांना जागतिक बाजारपेठ सहज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न
- खाद्यपदार्थ प्रक्रिया केंद्र उभारले जातील
- शेतकऱ्यांची व्यथा समजून घेऊन त्यांना माती परीक्षण, पीक लागवडीचे प्रशिक्षण, कृषी प्रदर्शनाद्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देणे-
- रत्नागिरी जिल्हा पाणी टंचाई मुक्तीसाठी ठोस पावले उचलली जातील
- रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची किनारपट्टी इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशनच्या धर्तीवर विकसित करणे
- कोकणातील निसर्ग संपन्नतेचा पुरेपूर वापर करून येथील पर्यटनाला चालना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
- बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून त्यांच्या इतर अडचणी दूर करणे
- मच्छि व्यवसायाला बळकटी या व्यवसायाला पुन्हा उर्जिताव्यस्था प्राप्त करून दिली जाईल
- पहिली ते बारावीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि अत्याधुनिक सुखसुविधांनी सुसज्ज अशी शाळा उभारली जाईल
- जिल्ह्यात UPSC/MPSC सारख्या स्पर्धापरीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्रे
- स्पोर्ट्स अकादमी, मैदाने आणि कला सादरीकरणासाठी, सरावासाठी केंद्रांची निर्मिती
- कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल
- गडकिल्ल्यांचा वारसा जपून शिवरायांचा अभिमानास्पद इतिहास सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वपूर्ण उपाययोजना