रत्नागिरी -कोकण म्हणजे जणू प्रति काश्मीरच. निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे. याच कोकणचे वैशिष्ठ्ये म्हणजे इथला हापूस आंबा. सातासमुद्रापार पोहचलेला या फळांच्या राजावरच कोकणची अर्थव्यवस्था ( Konkan economy ) अवलंबून आहे. हापूससह फणस, काजू कोकम ही सुद्धा कोकणची वैशिष्ट्ये. मात्र या फळांवर प्रकिया करणारे उद्योग कोकणात तसे मोठ्या प्रमाणात बहरलेले नाहीत.
कोरोना मुळे उद्योगाला फटका - त्यातल्या त्यात हापूसच्या प्रक्रिया उद्योगाने थोडीफार झेप घेतलेली आहे. त्यातच निसर्गाच्या चक्रावर हा उद्योग अवलंबून आहे. त्यात कॅनिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची कमतरता, सरकारचे अनुदान धोरण, दर्जा टिकवण्यासाठी होणारा खर्च, वाढता उत्पादन खर्च यामुळे कॅनिंग उद्योग अडचणीत आहे. त्यात गेली 2 वर्ष कोरोनाचा फटका या व्यवसायाला देखील बसला. पण तरीही अनेकांनी हा प्रकिया उद्योग मोठ्या कष्टाने सुरू ठेवला आहे. व्यवसायातील सातत्य, नव्या बाजारपेठांचा शोध, गुणवत्ता, धाडस व शोधक वृत्ती या गुणांच्या जोरावरच काहींनी आपली या उद्योगातील यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.
विदेशात मोठ्या प्रमाणात पल्पचे स्थलांतर - रत्नागिरी जिल्ह्यात छोटे मोठे जवळपास 50 पेक्षा जास्त आंबा कॅनिंग कारखाने/प्रकल्प आहेत. याबाबत बोलताना आंबा प्रक्रिया व्यवसायिक आनंद देसाई यांनी सांगितले की आंबा प्रक्रिया कारखान्यात मँगो पल्प, आंबा मावा तयार केला जातो. साधारणतः एका कॅनिंग प्रकल्पामध्ये 25 ते 200 जणांना रोजगार मिळतो. रत्नागिरी येथून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, अमेरिका, दुबई, लंडन आदी ठिकाणी पल्प निर्यात केला जातो.