रत्नागिरी - कोकणचा राजा हापूसलाही यावर्षी कोरोनाचे ग्रहण लागले आहे. सध्या आंबा काढण्यासाठी तसेच वाहतुकीला शासनाकडून परवानगी मिळाली आहे. काही प्रमाणात आंबा कोकणाबाहेरही जाऊ लागला आहे. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी आहे. त्यात विक्री व्यवस्था नसल्याने तयार आंबा झाडावरच लटकत असल्याचे चित्र आहे. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा विक्री केंद्रे उभारावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादन संघाच्यावतीने पणन मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा विक्री केंद्रे उभारावीत फळे, भाजीपाला नियमन मुक्त झाल्यामुळे ८ ते १० टक्के आडत, दलाली व्यापारी वर्गाला मिळत नसल्यामुळे व्यापारी वर्ग शेतकऱ्यांचा आंबा आणि फळांच्या विक्रीत फारसा रस दाखवत नाही. याला काही अंशी पर्याय म्हणून आंबा विक्री केंद्रांची मागणी करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला, रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, रायगड जिल्ह्यात पेण, ठाणे जिल्ह्यात कल्याण आणि पालघर जिल्ह्यात केळवे आणि माहिम या ठिकाणी विक्री केंद्रे उभी राहिली तर शेतकऱ्यांना जवळची बाजारपेठ मिळेल. तसेच आंबा वाहतुकीसाठी एसटीला परवानगी द्यावी, जेणेकरून आंबा शहरात येईल, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडेही करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादन संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.
सध्याच्या परिस्थितीमुळे थेट ग्राहकांना आंबा विक्रीची संधी बागायतदारांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने तातडीने निर्णय घेऊन आंबा विक्री केंद्र उघडण्यासाठी प्रयत्न करावेत. पणन मंडळाने राज्यातील छोट्या मंडई सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंतीही महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादन संघाने केली आहे.