महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 4, 2021, 1:15 PM IST

ETV Bharat / state

जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी; आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत

गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. आज पहाटे रत्नागिरीत हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळला. यामुळे आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Rain
पाऊस

रत्नागिरी - जिल्ह्याच्या काही भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. पहाटे पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र, चिंता वाढली आहे. थंडीचा ऋतू सुरू असतानाही पाऊस पडत असल्यामुळे आंबा पिक धोक्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यात थंडीही गायब झाली आहे.

आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत -

सध्याची वातावरणातील परिस्थिती आंब्यासाठी हानीकारक आहे. थंडी नसल्यामुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. सध्या आलेल्या मोहोराला फळधारणेसाठी पुरक परिस्थिती नाही. हे वातावरण असेच राहीले, तर बागायतदार अडचणीत येतील. सध्या दर आठ दिवसांनी बागांना फवारणी करावी लागत आहे. काही ठिकाणी थ्रिप्स किटकांचा प्रादुर्भाव झाल्याचेही दिसत आहे.

मुंबईतही पाऊस-

मुंबईशहरात देखील रविवारी रात्री पाऊस झाला. त्यामुळे मुंबईच्या तापमानात घट झाल्याची नोंद झाली आहे. पाऊस पडल्याने हवेतील गारवा मात्र वाढला आहे. अनेक ठिकाणी शेकोटी पेटवून त्याच्याभोवती लोक हात शेकतानाचे दृश्य नजरेस पडले. अलीकडेच मुंबईचे तापमान १३-१४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ६ ते ७ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असून पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details